पुणे – पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. येत्या 15 दिवसांत हे रस्ते दुरूस्त करा, नाही तर “शिवसेना स्टाइल’ आंदोलन करू, असा इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिला आहे. हे निवेदन त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
या निवेदनानुसार, “आज पुणे शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जूनमध्ये पाऊस झाला नसताना, जुलैमध्ये फक्त पंधरा दिवसांत झालेल्या पावसाने हे खड्डे पडले आहेत. पावसाळापूर्व कामांच्या माहितीत पालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 55 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले होते. तरी फक्त 15 दिवसांच्या पावसाने शहरभर खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. अनेक अपघातही होत आहेत. चारचाकी वाहनांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱ्यांनादेखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने रस्ते दुरुस्ती आवश्यक आहे.’