15 जूनपासून शाळेत जायचे की नाही?

शिक्षक, कर्मचारी अजूनही संभ्रमावस्थेत

पुणे – राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष, शाळा सुरु करण्याबाबत अद्याप मार्गदर्शक तत्त्वावर अंतिम शिक्कामोर्तब केलेले नाही. यामुळे 15 जूनपासून शाळेत जायचे की, नाही? असा संभ्रम शिक्षक, कर्मचारी यांच्यात निर्माण झालेला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अनेकदा दिले. मात्र, त्याबाबत शासनाने काहीच लेखी आदेश काढलेले नाहीत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप करण्यात येते. यंदा मात्र करोनामुळे सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजणारच नाही, हे स्पष्ट झाले.

विद्यार्थ्यांना ऑनलाइनचे धडे देण्यासाठी शाळांना पूर्व सूचना दिल्या आहेत. काहींनी ऑनलाइन शिक्षण सुरूही केले आहे. आता त्याचा जोर आणखी वाढण्याचीच शक्‍यता अधिक आहे. मोबाइल, टॅब, संगणक, लॅपटॉप घेण्यासाठी पालकांनी दुकानांकडे धाव घेणे सुरू केले आहे. या साहित्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात निश्‍चित वाढ झाली आहे. काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळांमध्ये उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्याबाबत व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मेसेजही फिरू लागले आहेत. त्यामुळे शाळेत जाण्याबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र शिक्षक, कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये कधीपासून उपस्थित राहायचे? याचे कोणतेही लेखी आदेश अद्यापपर्यंत काढलेले नाहीत. दरम्यान, दोन दिवसांत शासनाकडून शाळांबाबत स्पष्ट नियमावली जाहीर होणार आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.