रेडा -इंदापूर शहरात एकाच दिवसात दोन करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे नगरपालिकेने रविवारी (दि. 14) शहरात जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिकांनी शंभर टक्के जनता कर्फ्यू पाळून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
मागील तीन महिन्याहून अधिक काळ इंदापूर शहर करोनामुक्त ठेवण्यासाठी महसूल, नगरपालिका व पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून काळजी घेतली होती. मात्र इतर रेड झोन मधून ये-जा करणाऱ्या नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्यामुळे शहरात करोना बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इंदापुर शहरातील मुख्य बाजार पेठेत बॅंक कर्मचारी असलेल्या व्यक्तीला व वकील असलेल्या व्यक्तीच्या पत्नीला लागण झाल्याने शहरात धास्ती वाढली आहे.
इंदापूर तालुक्यात पुणे, मुंबई, सोलापूर व इतर रेड झोन मधून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. त्याबरोबरच शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे पुणे, मुंबईला कामानिमित्ताने स्थानिकांची येण्या – जाण्याची वर्दळ वाढली. काही नागरिक शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत.
त्यामध्ये पावसाळा चालू झाल्याने रोग पसरण्याची जास्तीची भीती वाढली आहे. करोना बाधित आढळलेले रुग्ण मुख्य बाजार पेठेत राहत असल्याने किती लोकांशी त्यांचा संपर्क आला आहे? याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे किमान सात दिवस शहर बंद ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.