माजी महापौर प्रशांत जगताप यांचा सवाल
पुणे – महापालिकेत अचानक येऊन खासदार गिरीश बापट यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली. मात्र, गेले 57 दिवस खासदार गिरीश बापट कोठे होते? महापालिकेत भाजपचे 100 नगरसेवक आणि 7 हजार 40 कोटी रुपयांचे बजेट असताना सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांसाठी काय केले, असा सवाल माजी महापौर प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारकडून पुणे शहराला आणि महाराष्ट्राला काय मदत मिळवून दिली, याचा खुलासाही बापट यांनी करावा. तसेच पुणे भाजपने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्यात आली. त्यावेळेस महाराष्ट्र धर्म का विसरलात? पालकमंत्री अजित पवार यांनी शहरासाठी मोफत रेशनवाटपाला 354 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व अधिकाऱ्यांच्या मागील 45 दिवसांत तब्बल 7 बैठका पुण्यात घेतल्या, अशी माहिती जगताप यांनी दिली. बापट यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देऊ, पण आमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत, असे आव्हान जगताप यांनी दिले आहे.