बीजिंग: जगभरातील करोनाच्या प्रादुर्भावास अमेरिकेने चीनला जबाबदार ठरविले. चीनने हा व्हायरस तयार केल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीदरम्यान युरोपीय युनियनच्या प्रस्तावाचे समर्थन दिल्यामुळे चीनचा तिळपापड झाला असून चीनने ऑस्ट्रेलियाला अमेरिकेचा पाळीव कुत्रा असल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियावरून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरही बंदी घालण्याचा चीनचा विचार सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप केला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेत युरोपीय युनियनच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा अर्थ ऑस्ट्रेलिया संपूर्ण प्रकरणात अपयशी ठरला आहे, असा होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या उत्पत्तीची स्वतंत्र तपासणी व्हावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाने केली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया चीनलाच लक्ष्य करत आहे.
ऑस्ट्रेलियाचे नेते चीनवर निशाणा साधत आहेत; परंतु यामुळे त्यांचेच नुकसान होत आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये चीनविरोधी वातावरण तयार होत आहे. चीनसोबत हा तणावाचा परिणाम ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांवर होऊ शकतो, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
करोना व्हायरसच्या उत्पत्तीवर ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र तपास करण्याची मागणी केली आहे. ही मागणी कोणत्याही विनोदापेक्षा कमी नाही, असे चीनच्या दूतावासाने म्हटले होते. यावर ऑस्ट्रेलियातील मंत्री सिमोन बर्मिंगम यांनी निषेध व्यक्त केला. तसेच आम्ही चीनच्या दूतावासासोबत कोणतीही चर्चा करणार नाही, असेही ते म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा परिणाम व्यापारावरही दिसून येत आहे. चीनने ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 80 टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही वस्तूंची आयात बंद करण्यासाठी एक यादीही तयार करण्यात आली आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने चीनमध्ये 18 अब्ज डॉलर्सची आयात केली होती.