अद्याप जलपर्णी कशी?
पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम 15 डिसेंबर 2018 पासून सुरू केले. 30 जूनपर्यंत या कामाची मुदत होती. या कामासाठी 36 लाख 86 हजार रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाची 17 डिसेंबरला सुरवात झाली. हे काम मूळ निविदेपेक्षा 7 टक्के जादा दराने देण्यात आले. त्यासाठी 19 लाख 12 हजार रुपये इतका खर्च मंजूर केला. जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही अद्याप जलपर्णी कशी?
पिंपरी – पवना आणि मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने ठेकेदारी तत्त्वावर दिलेल्या कामाची मुदत जून अखेर संपली. मात्र, अद्यापही दापोडी येथील हॅरिस ब्रिजजवळ मुळा नदीपात्रात तर, सांगवी येथे पवना नदीपात्रात, केजुदेवी बंधाऱ्याच्या परिसरात जलपर्णी ठाण मांडून बसली आहे. मुदत संपली तरी जलपर्णी हटली नसून, पावसामुळे वाढणाऱ्या पाण्यासोबत जलपर्णी वाहून जावी म्हणून प्रशासन आणि ठेकेदार वाट पाहताहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात मंगळवारी बुडालेला तरुण चार दिवस झाले तरी सापडू शकलेला नाही. हा तरुण दापोडी येथे जलपर्णीच्या खाली गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नदीपात्रात साचलेला जलपर्णीचा थर किती धोकादायक ठरू शकतो, हे चित्र यातून समोर येत आहे.
सांगवी आणि दापोडी यांना जोडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाच्या खाली जलपर्णीचा मोठा थर साचला आहे. त्यातून परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. दापोडी येथील हॅरिस ब्रिजजवळ असलेल्या रेल्वे पुलाखाली मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. पालिकेकडून जलपर्णी काढण्यासाठी वर्षभराचे काम दिल्यानंतरही नदीपात्रात जलपर्णी कायम राहत असल्याने या कामाबाबतच प्रश्न उपस्थित होत आहे.
थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्याच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली होती. मात्र, पावसाच्या पाण्यासोबत ही जलपर्णी वाहून गेली. सध्या येथील बंधाऱ्यावर अडकून राहिलेली जलपर्णी पाहण्यास मिळाली. लाखो रुपये खर्चून काहीही न करता नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले.
जलपर्णी निघाली आहे की नाही, हे पाहूनच ठेकेदाराला बिल अदा केले जाते. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर याबाबत नियंत्रण ठेवण्यात येते. जलपर्णी पूर्ण काढली नसेल तर बिले अदा करू नये, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत. जून अखेर जलपर्णी काढण्याची मुदत संपली आहे. नवीन निविदा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये काढण्यात येणार आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी,