– विशाल धुमाळ
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांतर्गत यंदा दौंड विधानसभेसाठी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, भीमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत इच्छुक आहेत. यातील वैशाली नागवडे वगळता बाकी सर्वांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी दौंड शहरात पक्षाची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला आनंद थोरात आणि महेश भागवत हे इच्छुक उपस्थित नव्हते. ते वगळता सर्व इच्छुक उपस्थित होते. त्या बैठकीत माजी आमदार रमेश थोरात यांनी पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचे काम करण्याचा ठराव मांडला. त्याला तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी अनुमोदन दिले. हा ठराव मांडून तो संगनमताने पास करून घेऊन रमेश थोरात यांनी पक्षातील इच्छुकांना पक्ष विरोधी भूमिकेपासून लांब जाण्यास रोखले असल्याची चर्चा थोरात समर्थकांत आहे, तसेच रमेश थोरात यांनी हा ठराव मांडून निवडणुकीत आपले काम करण्यास ही मंडळी कटिबध्द राहतील, असा विश्वास देत आम्ही एक आहो, याचे उदाहरणच दाखवून दिले आहे. या बैठकीला आनंद थोरात आणि महेश भागवत हे उपस्थित नव्हते, त्यामुळे या ठरवाबाबत सध्या तरी ते काही बोलत नसून ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठरावाला त्यांची संमती आहे की नाही, हेही कळायला मार्ग नाही.
इच्छुकांपैकी रमेश थोरात हे माजी आमदार असून, सध्या जिल्हा बॅंकेचे अध्यक्षही आहेत त्यामुळे त्यांना पक्षाकडून ताकद मिळाली आहे, तसेच यावेळी त्यांनाच तिकीट मिळेल असे त्यांचे समर्थक बोलून दाखवत आहेत. या ठरवामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीही वीरधवल जगदाळे, आप्पासाहेब पवार यांनीही हा ठराव झाल्याने आता पक्षात आपले वजन वापरून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते पक्ष श्रेष्ठींच्या संपर्कात आहेत आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच पक्षाकडे इच्छुक म्हणून अर्ज भरला नसतानाही वैशाली नागवडे यांचे नाव चर्चेत आहे. एकंदरीत तालुका राष्ट्रवादीने एकमुखी निर्णय घेत पक्ष देईल त्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करण्याचा ठराव झाल्याने इच्छुक आता तिकिटाच्या “सेटिंग’ला लागले आहेत.