‘मुख्यमंत्री ग्रामसडक’ निकृष्ट काम बेधडक

झेंडेवाडी ते वाळुंज रस्त्यावरील पुलाचे कॉंक्रिट उखडले

सासवड – झेंडेवाडी ते वाळुंज पालखी मार्गावरील काळेवाडी (ता. पुरंदर) येथील पुलाचे कॉंक्रिट एका वर्षातच पूर्णतः उखडले असून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही यातून दुचाकीस्वार पडणे तसेच पायांना गंभीर दुखापत होण्याची प्रकार घडले आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत साडेनऊ किलोमीटरच्या झेंडेवाडी रस्त्यासाठी पालखी पर्यायी मार्ग म्हणून 5 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या रस्त्यावर नऊ साकव पुलांचे काम झाले आहे. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचे त्यांच्या दुरवस्थेतून उघड होऊ लागले आहे. रस्त्याच्या टेंडर मध्ये नमूद केलेल्या सुरक्षा नियमांचे कोणतेही पालन कंत्राटदाराने केलेले नाही. अवघ्या सहा महिन्यांतच रस्त्याला पॅच मारावे लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

काळेवाडी येथील ग्रामस्थांनी सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह करून ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाने या गोष्टीकडे कानाडोळा करण्याची भूमिका अवलंबल्याचे दिसून येत आहे. हा पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाचे काम चार ते पाच इंच खचले असून कॉंक्रिट उघडले आहे. झेंडेवाडी ते वाळूंज या पर्यायी पालखी मार्गाच्या कामात संबंधित ठेकेदाराने हलगर्जी केल्याचे दिसून येत आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून रस्त्याकडेला थर्मोप्लास्टी-रिफ्लेक्‍टरचा वापर केला नसल्यामुळे रस्त्याच्या चढ-उतारांचा अंदाज वाहन चालकांना रात्रीच्या वेळी येत नाही. रस्त्यावर सूचना फलक लावलेले नाहीत त्यामुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.

पुलावरील कॉंक्रिट दुरुस्तीचे काम दोन दिवसांत केले जाईल. या ठिकाणी रस्त्याची उंची देखील वाढवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाईल. संबंधित ठेकेदारांना सूचना करण्यात येतील.
– प्रशांत पवार, शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

Leave A Reply

Your email address will not be published.