Rajnath Singh – झपाट्याने बदलणारी भू-राजकीय परिस्थिती पाहता, हमास-इस्रायल संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की,
भारतीय वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या हवाई (air defense system) संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यावर आणि ड्रोनचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी केले आहे.
देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय हवाई (air defense system) दल कमांडर्स परिषदेला संबोधित करताना राजनाथ सिंह बोलत होते. या बैठकीत भारताच्या पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील हवाई सुरक्षेच्या मुद्द्यावरही हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी विश्लेषण केले.
राजनाथ सिंह पुढे असेही म्हणाले की, सध्याच्या बदलत्या परिस्थितीत लष्कराला त्यांची ऑपरेशनल तयारी मजबूत ठेवावी लागेल. तरच लष्कर आणि वायूदलाच्या संयुक्त मोहिमांना काही अर्थ असेल.
कारण सध्याच्या जागतिक सुरक्षेच्या परिस्थितीत अनेक नवीन आव्हाने उभी राहत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला नेहमीच तयार राहावे लागेल.
राजनाथ यांनी आपल्या भाषणात लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये उत्तम समन्वय आणि कोणत्याही ऑपरेशन दरम्यान संयुक्त नियोजनावर भर दिला. त्यांनी हवाई दलाच्या कमांडर्सना झपाट्याने बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीचे आकलन करून भारतीय वातावरणानुसार त्यांचे विश्लेषण करून ते लागू करण्यास सांगितले.
सिक्कीम-हिमाचलमधील मदतकार्याचे कौतुक !
राजनाथ सिंह यांनी हिमाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये नुकत्याच आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी हवाई दलाने उचललेल्या पावलांचे कौतुक केले.
प्रयागराज, यूपी येथे एअर फोर्स डे परेडचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले. या बैठकीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान देखील उपस्थित होते.