नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार (TMC MP) महुआ मोईत्रा सध्या देशभर चर्चेत आहेत. संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant dube) यांनी केला असून याची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी गंभीर दखल घेत आचार समिती गठीत केली होती. या समितीसमोर आज सुनावणी पार पडली.
खासदार महुआ मोइत्रा (MP Mahua Moitra) यांना लोकसभेच्या आचार समितीने संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी (कॅश फॉर क्वेरी) 31 ऑक्टोबर रोजी पुन्हा बोलावले आहे. आचार समितीचे प्रमुख विनोद के सोनकर यांनी ही माहिती दिली. खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीची सुनावणी करणाऱ्या आचार समितीचे अध्यक्ष, भाजप खासदार विनोदकुमार सोनकर आहेत. व्ही. डी. शर्मा, सुमेधानंद सरस्वती, अपराजिता सारंगी, डॉ. राजदीप रॉय, सुनीता दुग्गल आणि सुभाष भामरे हे समितीचे सदस्य आहेत.
आचार समितीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी महुआंचे वकील जय अनंत देहादराय उपस्थित होते. जय अनंत यांच्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेही समितीसमोर हजर झाले. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून तृणमूल कॉंग्रेस खासदाराने संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप दुबे यांनीच केला होता. (cash for query)
चौकशी केल्यानंतर निशिकांत यांनी सांगितले की, जेव्हाही त्यांना बोलावले जाईल तेव्हा ते समितीसमोर हजर होतील. माझ्याकडून जो काही पुरावा मागितला जाईल, तो मी देईन, संपूर्ण सत्य कागदपत्रांमध्ये आहे. कॉंग्रेसकडून या समितीत व्ही. वैथिलिंगम, एन उत्तम कुमार रेड्डी, बालासोर वल्लभनेनी आणि प्रणीत कुमार यांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेनेचे हेमंत गोडसे, जेडीयूचे गिरीधारी यादव, सीपीआय (एम)चे पीआर नटराजन आणि बसपचे दानिश अली यांचा समावेश आहे.