वाठार स्टेशन – वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी वाठार पोलिसांनी कसून तपास करून दहा लाखाचा मुद्देमाल व तीन संशयितांना जेरबंद केले. वाठार पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १२ जून रोजी रात्रीच्या दोनच्या सुमारास हासेवाडी येथून निळा रंगाचा फोर्स ट्रॅक्टर चोरीस गेला होता.
या घटनेची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात नोंद होती. त्या तपासाच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपासाची सूत्रे हलवत चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ठिकाणापासून ललगुण, डिस्कळ, पुसेगाव, फलटण, शिंगणापूर, दहिवडी परिसरातील उपलब्ध सर्व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व संशयितांच्या मोबाइल लोकेशनद्वारे तसेच मिळालेल्या माहितीनुसार वाठार पोलिसांना तीन संशयितांपर्यंत पोहोचता आले.
संशयितांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला फोर्स ट्रॅक्टर व मोटर सायकल तसेच चोरून आणलेली ईरतिका कार जप्त केली. एकूण १० लाखाचा मुद्देमाल जप्त करून वाठार पोलीस ठाण्यात जमा केला. संशयितांनी विविध गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यामध्ये एक वर्षापूर्वी चोरलेली ईरटीका कार व मोटरसायकलचा समावेश आहे.
या चोरून आणलेल्या कारचा वापर ते चोरीसाठी करत होते. त्यांनी कारची रजिस्ट्रेशन केलेली नंबर प्लेट काढून बनावट नंबर प्लेट लावून गाडीचा वापर करीत असत. संशयितांकडून दहिवडी, फलटण शहर, ग्रामीण या परिसरात मोटरसायकल चोरी केल्याचा संशय असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, सहाय्यक फौजदार भोसले, हवालदार केंजळे, पोलीस नाईक तुषार आडके, गणेश इथापे यांनी केली.