लखनऊ – गुंतागुंतीची जातीय समीकरणे, धार्मिक मुद्दे, शिक्षित तरूण विकास, रोजगार, यांसह आता उत्तरप्रदेश निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात प्रचार युक्रेनच्याही मुद्द्यावर आला आहे. रशिया युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप आणले, आम्ही त्यांच्या कसे संपर्कात होतो, त्यांना कशी मदत केली याचा सर्वच पक्षातील उमेदवारांचे समर्थक लाभ उठवत आहेत.
उत्तरप्रदेशमधील सुमारे तीन हजारहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याचे सांगितले जाते. त्यातील काहीजण आपापल्या घरी परतले आहेत. सद्या निवडणूक आणि युक्रेन या दोनच विषयाची चर्चा घरोघरी आहे. त्यामुळे उमेदवारांचे समर्थक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. परत आलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ केले जात असल्याचे अभिषेक प्रजापती या युवकाने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व सभांमध्ये युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. दरम्यान, युक्रेन मुद्याचा भाजपला किती प्रमाणात फायदा होणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.