मुंबई – राज्यात सध्या ईडीच्या कारवाईवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून वाद पेटला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुन्हा एका धमका करण्याच्या तयारीत आहे. “खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे’ असे सूचक ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. मध्यंतरी नवाब मलिक यांना अटक झाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बॅकफुटवर गेले होते. आता पुन्हा एकदा संजय राऊत मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट केले की, “खेळ नुकताच सुरू झाला आहे. आज पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्रीय एजन्सीजच्या अधिकारांचा गैरवापर करून काही जणांना वेठीस धरण्याचे पुरावे सादर केले. सोबतच काही अधिकारी “वसुली एजंट्स’ मार्फत खंडणी व ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले आहेत, याचे पुरावे देखील सादर केले, अशी माहिती त्यांनी दिली.
जे काही पुरावे दिले आहे. अधिक तपशील शेअर करण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे संजय राऊत आता काय खुलासा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.