किव्ह – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी युक्रेनकडून होऊ शकते. अशी नुकसान भरपाई मागणाऱ्या याचिकांची संख्या अंदाजे १० लाखांपर्यंत जाऊ शकते, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
युक्रेन, नेदरलॅन्डचे वरिष्ठ मंत्री, युरोपीयन संघाच्या विविध संस्थांंचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये युक्रेनमधील नुकसानीच्या नोंदणीसाठीचे कार्यालय हेग येथे सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये नुकसान झालेल्या रहिवासी मालमत्तांच्या नोंदणीला महत्व देण्यात येणार आहे. यामध्ये ३ ते ६ दशलक्ष मालमत्तांची नोंदणी होण्याची शक्यता आहे. हे या संदर्भातले पहिले मोठे पाऊल आहे, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी म्हटले आहे.
झालेल्या नुकसानीची जबाबदारी रशियाला घ्यायला लावणे एवढेच महत्वाचे नसून त्यासाठी निश्चित प्रक्रीया सुरू केली जाणेही महत्वाचे आहे. याचसाठी ही नोंदणी होणेही गरजेचे होते, असे ते म्हणाले.
रशियाच्या आक्रमणात मरण पावलेल्या, जखमी, छळ झालेले, लैंगिक अत्याचार, अपहरण झालेल्या व्यक्तींची स्वतंत्र नोंदणी केली जाईल. त्यांच्या नातेवाईकांकडून स्वतंत्रपणे भरपाईची मागणी केली जाऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
युक्रेनमधील ज्या उद्योगांचे नुकसान रशियाच्या हल्ल्यांमुळे झाले ते देखील भरपाई मागण्यासाठी पुढे येऊ शकतात. या नोंदणीमध्ये ६ ते ८ दशलक्ष व्यक्ती आणि संस्थांची नोंदणी असू शकते. आंतरराष्ट्रीय लवादाच्या माध्यमातून ही भरपाई रशियाकडून मागितली जाऊ शकते, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.