वाघोली – लॉकडाऊनच्या काळात वाघोलीतील सरकारी व खाजगी रुग्णालयात रुग्णांची अनावश्यक गर्दी वाढत आहे. ही गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत होऊ शकते. गर्दी टाळण्यासाठी तसेच प्राथमिक उपचार देण्यासाठी वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने मेडिकल हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
हेल्पलाईनमध्ये वाघोलीतील जवळपास ९० डॉक्टर व डॉक्टर असोसिएशन पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक किंवा मानसिक कोणतीही समस्या असल्यास डॉक्टर्सना त्यांच्या फोन नंबरवर संपर्क करून शंका दूर करून, आरोग्याविषयी सल्ला अथवा प्राथमिक उपचार सल्ला घेता येईल.
सदर हेल्पलाईनद्वारे कायद्याच्या कक्षेत राहून मर्यादित स्वरूपाचाच प्राथमिक औषधोपचार सुचवला जाईल. नागरिकांना तपासणीसाठी जवळच्या दवाखान्यात जाणे तसेच फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
सदरची हेल्पलाईन मुख्यतः आरोग्य विषयक सल्ला व त्या संबंधी येणाऱ्या अडचणी यांचे निवारण करण्यासाठी आहे. केवळ वाघोली परिसरातील लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या चांगल्या हेतूने सुरु केलेली सेवा असल्याचे वाघोली डॉक्टर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष विनोद सातव यांनी सांगितले.