पिंपरी – प्रॉम्प्ट पर्सोनेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामगारांना दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची तक्रार मनसेकडे आली. मनसेच्या पदाधिकाऱ्याने याबाबत कंपनी व्यवस्थापनाला विचारणा केली. व्यवस्थापनासमवेत दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर तोडगा निघाला आणि 24 तासातच कामगारांच्या खात्यात पगार जमा झाले.
मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी सांगितले की, माझ्याकडे काही कामगारांची तक्रार आली की पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील शेकडो कामगारांना कंपनीकडून गेल्या दोन महिन्यांपासून पगार देण्यात आलेले नाही. करोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. त्यातच कंपनीने सर्वसामान्य कामगारांचे पगार दिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.
कामगारांकडून कंपनीची माहिती घेतली व त्वरित कंपनीच्या मालाड-ठाणे (मुंबई) येथील कार्यालयात कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला. कोणतेही कारण न देता कामगारांचे पगार त्वरीत द्यावेत, अशी मागणी संबंधितांकडे केली. कंपनीकडून कामगारांना लवकरात लवकर पगार देण्यात येतील, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले.
कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याप्रमाणे कामगारांच्या बॅंक खात्यामध्ये 24 तासाच्या आत पगार जमा झाले. पगार जमा झाल्याचे अनेक कामगारांनी दूरध्वनीद्वारे सांगितले. दरम्यान, याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता काही तांत्रिक कारणास्तव कामगारांना पगार देण्यास उशीर झाला. मात्र, आता कामगारांचे पगार करण्यात आलेले आहे, असे सांगण्यात आले.