सेनेच्या बंडाळीचा तोटा कुणाला?
नगर – जिल्हा नियोजन समितीच्या महापालिकेच्या दोन जागांसाठी गुरुवारी (दि.26) जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा सैनिक लॉनमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल. अवघे 67 मतदार असल्यामुळे दोन तासांत दोन्ही जागांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मंगळवारी या दोन्ही जागांसाठी 100 टक्के मतदान झाले.पात्र सर्व 67 नगरसेवक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व अमोल येवले या दोन्ही शिवसैनिकांत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्या लढत झाली. शिवसेनेचे अनिल शिंदे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. भाजपाच्या नगरसेविका आशाताई कराळे या यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. परंतु शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत ही सरळसरळ लढत झाल्याने महाआघाडीत बिघडी झाली असल्याचीही चर्चा आहे.
यावेळी शिवसेनेचे 23 नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 19 नगरसेवक, भाजपाचे 14 नगरसेवक, बहुजन समाज पार्टीचे 4 नगरसेवक, कॉंग्रेसचे 5 नगरसेवक अपक्ष 1 नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे 1 नगरसेवक अशा एकूण 67 मतदारांनी मतदानाचा हक्का यावेळी बाजवलेला आहे. परंतु राज्यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. असे असताना नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सारिका जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे उभे ठाकल्याने ही निवडणूक म्हणजे महाआघाडीत बिघाडी आहे.