घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत

सातारा जिल्ह्यातील धक्‍कादायक प्रकार

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झाले. मात्र, इथे एक धक्‍कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केले आहेत.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्‍यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा धक्‍कादायक प्रकार घडला. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत जात असल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

ग्रामस्थांच्या या तक्रारींकडे सुरुवातीला मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यामुळे एकच गोंधळ झाला. त्यानंतर यामध्ये पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे नवले गावात काल मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण होते. दहा-बारा तक्रारी आल्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास इथले ईव्हीएम बदलण्यात आले. मात्र, तोवर सुमारे 290 मतदारांनी मतदान केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे नंतर वारंवार याबाबत मतदारांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधीत मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं.

Leave A Reply

Your email address will not be published.