चला, किल्ला बनवू या! दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न

पिंपरी – परीक्षा आटोपून जशा शाळांना दिवाळीच्या सुट्टी लागत आहेत. तसे लहान मुलांनी किल्ला बनविऱ्यात मग्न झाले आहेत. सध्या किल्ले बनविण्याच्या कामाला वेग आला असून शहरातील पिंपरी, चिंचवड, दापोडी व मोशी येथील सस्ते वस्तीतील कुंभार वाड्यातील कारागीर लहान मुलांच्या आवडीचे गड-किल्ले, तोफा, हत्ती, घोडे, मावळे बनवित आहेत.

यासाठी बरेच कारागीर पर्यावरणाची बांधिलकी जपत शाडूच्या मातीचे गड-किल्ले बनवत आहेत तर, काही ठिकाणी पिओपी, नारळाच्या भुशाचा वापर करुन गड किल्ले बनवत आहेत. यात वाटरप्रुफ सोबत विविध रंगाचा वापर करुन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. मोबाइल आणि टीव्ही गेम्सच्या आक्रमणानंतरही अनेकांची किल्ला बांधण्याची आवड आजही कायम असल्याचे दिसून येते.

पूर्वी दिवाळीची सुट्टी सणाला प्रारंभ होण्याआधी किमान आठवडाभर आधीच किल्ले बनविण्यास सुरु होत असे. यंदा मात्र शाळांच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. आता बच्चे कंपनीची किल्ले बांधणीसाठी लगबग सुरु आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यामंध्ये शिवनेरी, रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पन्हाळा, विशाळगड, हरिश्‍चंद्र गड, राजगड, असे विविध किल्यांचे प्रतिरूप वेगवेगळ्या आकारात बनविण्यात येत आहेत. परंतु यंदा स्वराज्याची राजधानी रायगड, तसेच प्रतापगड किल्ला साकारण्यावर मुलांचा अधिक भर दिसून येतो. किल्ले बनविण्यातून कारागिरांना मोठा रोजगार मिळतो. तर, लहान मुलांना यातून ऐतिहासिक माहिती मळते आणि आनंद मिळतो. तसेच मुलांच्या सृजनशीलतेचा विकास होतो. यंदा किल्ल्यांच्या किमती दोनशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. याचा एक फूट आकाराच्या किल्ल्यांची किंमत दोनशे रूपये तर तीन ते चार फुटांच्या मूर्तींची किंमत तीन ते चार हजार रूपयापर्यंत ठेवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.