पिंपळे निलख, दि. 23 (वार्ताहर) – बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यात मानवी शरीराला घातक ठरतील अशी औषधे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अशा औषधांवर पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पर राज्यातून महाराष्ट्रात व पुणे शहरात येणाऱ्या अनेक धोकादायक व नशेसाठी उपयोगात आणले जाणाऱ्या प्रतिबंधक औषधी ऑनलाइनद्वारे व इतर माध्यमातून सर्रास मागविल्या जात आहेत. त्या घरपोच डेलीव्हरीद्वारे व इतर पद्धतीने मिळत आहेत. ती औषधी कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा लिहून न देता थेट ऑर्डर टाकून मिळत असल्याने नागरिकांना धोकादायक व जिवास घातक ठरू पाहत आहेत. ऑनलाइन औषधी विक्रीला कोणतीही परवानगी नसताना आज ऑनलाइन औषध विक्री होत आहे. त्यामुळे ऑनलाइन औषधे रुग्णाला कधी ऑफलाइन करून टाकतील याचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे कोणतेही औषधांची खरेदी करताना डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. अवैध औषधविक्रीवर राज्य शासन व अन्न व औषध प्रशासनाने यात लक्ष घालावे, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
मुख्यमंत्री कार्यालयानेही सदर बाबीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागास त्या संदर्भात चौकशी व कारवाई करण्यासाठी सूचना केली असल्याचे तापकीर यांनी सांगितले. या संदर्भात अन्न व औषण प्रशासनाने तात्काळ पावले उचलून ऑनलाइन औषधी विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
परराज्यातून येणारी औषधे कोणत्या प्रकारची व त्यात कोणत्या प्रकारचे गुणधर्म आहेत याबद्दल आपणास काही कल्पना नसते. ती योग्य आहेत की अयोग्य, गुणवत्ता, मूळ आहेत की नक्कल, गर्भपाताची औषधे, नशेचे औषधे, झोपेच्या गोळ्या या सर्व थेट कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता खरेदी केली जात आहे. अशी औषधे रुग्णांच्या हातात पडतात तसेच सवलतीच्या दरात मिळत असल्याने नागरिक खरेदी करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.