Shyam Singh Yadav । बहुजन समाज पक्षाने पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार बदललाय. बसपने यापूर्वी श्यामसिंह यादव यांचे तिकीट कापून श्रीकला रेड्डी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, पक्षाने आता पुन्हा एकदा श्यामसिंह यादव यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना पुन्हा तिकीट दिलंय.
श्रीकला यांनी जौनपूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी दाखल केली होती. बसपने जौनपूरमधून श्रीकला यांच्या नावाची घोषणा केल्यापासून जौनपूरच्या निवडणुकीच्या वातावरणात बदल दिसून आला होता. या जागेवरून भाजपने कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिलीय. तर समाजवादी पक्षाने बाबूसिंह कुशवाह यांना मैदानात उतरवलयं. श्रीकला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने भाजप आणि बसपा यांच्यातच लढत होईल, असे मानले जात होते. मात्र श्यामसिंह यादव मैदानात उतरल्याने ही लढत आता तिरंगी होण्याची शक्यता आहे.
श्यामसिंह यादव यांची प्रतिक्रिया Shyam Singh Yadav ।
जौनपूरचे बसपा खासदार श्याम सिंह यादव म्हणाले की, बहुजन समाज पक्षाने त्यांना पुन्हा जौनपूरमधून उमेदवार केले आहे. श्याम सिंह यादव सांगतात की, रात्री 1 वाजता त्यांना बसपा सुप्रीमो मायावती यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की त्यांना पुन्हा जौनपूरमधून बसपा उमेदवार बनवले जात आहे. ते म्हणाले की, आम्ही पक्षाच्या पाठीशी नेहमीच उभे राहिलो. या निर्णयामुळे खूप आनंद झाला. आता आम्ही नेहमीच जौनपूरच्या जनतेच्या पाठीशी उभे राहू. तसेच, दुपारी एकच्या सुमारास माझे प्रतिक येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर मी उमेदवारी अर्ज दाखल करेन.
जौनपूर लोकसभा मतदारसंघ Shyam Singh Yadav ।
जौनपूर हा उत्तर प्रदेशातील लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. राज्यात लोकसभेच्या 80 जागा आहेत. जौनपूर मतदारसंघात बदलापूर, शहागंज, जौनपूर, मल्हानी आणि मुंगराबादशाहपूरसह 5 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हा मतदारसंघ सर्वसाधारण जागा आहे. या भागात बसपा आणि भाजप हे प्रमुख पक्ष आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बसपचे श्याम सिंह यादव यांनी 80,936 मतांच्या फरकाने जागा जिंकली. श्याम सिंह यादव यांना 50 टक्के मतांसह 521,128 मते मिळाली आणि त्यांनी 440,192 मते मिळविणारे भाजपचे कृष्ण प्रताप सिंह केपी यांचा पराभव केला.