नागपूर – महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत जागा वाटपाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित दोन ते चार जागांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीची दुसरी महत्त्वाची बैठक लवकरच होणार आहे. पहिल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भातील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन ते चार जागांबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फार्म्यूला अंतिम होईल.
महायुतीत एकनाथ शिंदेंचे काय होईल यावर आपण भाष्य करू शकत नाही. महायुतीच ते ठरवेल. महायुतीत गेलेले घटकपक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे. एकतर त्यांना गुलामगिरी करावी लागेल किंवा महायुतीतून बाहेर पडावे लागेल. महायुतीचा फॉर्म्यूला ठरला असला तरी ते जास्तीत जास्त जागा भाजपा स्वत:कडे ठेवणार आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकाण्यांबद्दल लोकांमध्ये मानसन्मान नाही
सुनील केदार यांनी व्यक्तीगत संबंधापोटी नरेंद्र जिचकार यांना साथ दिली असेल तर त्यात गैर काही नाही. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला म्हणून सोबत राहणे चुकीचे नाही. जनतेची सेवा करण्यापेक्षा सत्तेसाठी लोक एकत्र येतात, तेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झालेली मंडळी जनतेच्या सेवेसाठी नाही हेच दिसते. आता अशा राजकारण्यांबद्दल लोकांमध्ये मानसन्मान राहिलेला नाही. याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.