पिंपरी – राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांची गुरुवारी (दि. १) ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी ईडीने २४ जानेवारी रोजी त्यांची चौकशी केली. ही चौकशी राजकीय सुडापोटी आहे. कारखाना लिलावाच्या बाबतीत सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. केवळ राजकीय सूड घेण्यासाठी ईडी चौकशी करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी मागील चार वर्षांच्या काळात वाढणारी बेरोजगारी, पेपरफुटी व त्यावर कायदा, कंत्राटी नोकरभरती, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग यासह अनेक प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. राज्यातील युवकांचे, महिलांचे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सरकारच्या पातळीवर लढा उभा करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला.
या लढ्याला महाराष्ट्रातून जनतेचा व युवकांचा मिळणारा पाठिंबा पाहून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांच्या आडून राजकीय सूड उगवण्याचे काम सध्या भाजपा करत आहे. याच हुकूमशाही कारभाराच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील जिल्ह्यांमध्ये घंटानाद आंदोलन करणार आहे, अशी माहिती वरपे यांनी दिली.