लॉकडाऊनमधील जप्त वाहने परत मिळणार

पुणे – लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन केले म्हणून जप्त केलेली वाहने मालकांना परत करण्यात येणार आहेत. दुचाकीला दीड आणि चारचाकीला अडीच हजार रुपये अनामत रक्‍कम आणि हमीपत्र जमा करून वाहन परत नेता येणार आहे. त्या बाबतचे परिपत्रक पोलिसांनी काढले आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशी हजारो वाहने पडून आहेत.

लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडले किंवा पोलीस पास नसताना प्रवास केला म्हणून पोलिसांनी लॉकडाऊन काळात सुमारे 45 हजार वाहने जप्त केली. अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाल्याने अनेक नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे संबंधित वाहनचालकांना त्यांच्या गाडीची गरज भासणार आहे. या सर्वांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी या गाड्या परत देण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार असून केवळ त्या जप्त केल्या जाणार नाहीत.

…अशी असेल प्रक्रिया
वाहन ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केले आहे. तेथील, पोलीस निरीक्षकास वाहनचालकाने आपले वाहन परत मिळण्याबाबत अर्ज करायचा आहे. अर्जासोबत हमीपत्र देऊन दुचाकीसाठी अनामत रक्‍कम पोलिसांकडे जमा करायची आहे. त्यांनतर वाहन परत मिळणार आहे.

वाहन परत देण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. ज्यांचे वाहन जप्त केले आहे त्याने संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाशी संपर्क साधावा. अर्ज व अनामत रक्‍कम दिल्यानंतर त्वरित त्यांचे वाहन परत दिले जाणार आहे.
– डॉ. संजय शिंदे, अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त

Leave A Reply

Your email address will not be published.