पाथर्डी : नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाथर्डी आणि शेवगाव दोन्ही तालुक्यातून हजारो कार्यकर्ते नगरच्या दिशेने शेकडो वाहाने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने सोमवारी सकाळपासून करंजी घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार विखे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यासाठी दक्षिण मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते नगर शहरात दाखल झाले होते. आपल्या नेत्यांची भाषणे व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती. पाथर्डी, शेवगाव तालुक्यातून शेकडो वाहने नगरच्या दिशेने धावत होती.
यामुळे कार्यकर्त्यांची वाहने व लग्न समारंभासाठी रस्त्यावर असणारे वाहने यांची मोठी गर्दी होऊन सुमारे दोन तास करंजीच्या घाटामध्ये वाहनांची दुतर्फा गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली. अनेक कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याच्या व सभेच्या वेळेत त्या ठिकाणावर पोहोचता आले नाही तर काही कार्यकर्ते वाहतुकीची कोंडी पाहून आता सभा आपल्या हाती लागणार नाही म्हणून निम्म्यातून परत गेले. या अर्ज भरण्याच्या निमित्ताने विखे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.