नवी दिल्ली – देशापुढे सध्या करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. विषाणू संसर्गाच्या या लाटेमध्ये नव्या बाधितांसोबतच करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या देखील वाढल्याचं पाहायला मिळालं.
विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले असून यामुळे रुग्णसंख्येचा आलेख मंदावत असल्याची सुखद आकडेवारी हाती लागत आहे. असं असलं तरी तज्ज्ञांनी याआधीच तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने यावेळी पहिल्या लाटेनंतर दाखवलेली बेजबाबदारी आता दाखवून चालणार नाही.
तिसऱ्या लाटेचा दाह कमी करायचा असल्यास लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला देखील जाणकारांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशातील लसीकरणाच्या सद्यस्थितीबाबत आरोग्यमंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण
केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहिमेस हिरवा कंदील दाखवला होता. मात्र अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याने व पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस द्यायचा असल्याने ही मोहीम संथ गतीने सुरु असल्याचेच पाहायला मिळतंय. देशात आतापर्यंत या वयोगटातील नागरिकांना लसीचे १.०६ कोटी डोस देण्यात आले आहेत. या वयोगटामध्ये आतापर्यंत केवळ पहिला डोस देण्यात आलाय.
४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण
देशात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. याद्वारे आतापर्यंत एकूण १४.४६ कोटी डोस देण्यात आलेत. यापैकी ११.७५ कोटी डोस पहिले तर २.८१ कोटी डोस दुसरे आहेत. याचाच अर्थ या वयोगटातील एकूण २.८१ कोटी लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
आरोग्यकर्मी व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण
लसीकरण मोहिमेद्वारे देशात आरोग्यकर्मींना एकूण १.६५ कोटी डोस देण्यात आले असून यातील ०.९८ कोटी डोस पहिले तर ०.६७ कोटी डोस दुसरे आहेत. म्हणजेच देशातील ६७ लाख आरोग्यकर्मींना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेत.
देशामध्ये फ्रंटलाईन वर्कर्सना एकूण २.३३ कोटी लसीचे डोस देण्यात आलेत. यापैकी १.५० कोटी डोस हे पहिले असून ०.८३ कोटी दुसरे डोस आहेत. या वयोगटातील ८३ लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेत.
देशात आतापर्यंत लसीचे एकूण १९.६० कोटी डोस देण्यात आले आहेत. यातील दुसऱ्या डोसची संख्या ४.३१ कोटी इतकी आहे. म्हणजेच देशातील ४.३१ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर १५.२९ कोटी लसीचे डोस हे पहिल्या टप्प्यातील असल्याने इतक्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याचं स्पष्ट होत.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाचा वेग ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणापेक्षा मंद
या वयोगटातील लसीकरण १ मे पासून सुरु झाले आहे. याबाबत आरोग्यमंत्रालयाच्या संकेतस्थळावर २४ मे २०२१ सकाळी ८ वाजेपर्यंतची माहिती देण्यात आली असून एकूण १.०६ कोटी डोस देण्यात आले आहेत. १ मे ते २३ मेपर्यंत देण्यात आलेल्या लसींची सरासरी काढल्यास ती प्रतिदिवस ४ लाख ६१ हजारांच्या आसपास असल्याचं स्पष्ट होत.
तर दुसरीकडे १ एप्रिलपासून सुरु झालेले ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत १४.४६ कोटी लसींचे डोस देण्यात आलेत. ही आकडेवारी देखील २४ मे २०२१ सकाळी ८ वाजेपर्यंतची आहे. याची सरासरी काढल्यास दिवसाला २७ लाखांपेक्षा अधिक डोस दिले गेल्याचं स्पष्ट होतंय.
A total of 14.56 crore (1st & 2nd doses) vaccines have been administered to people above 45 years of age. While 1.06 crore vaccines (1st dose) has been administered to people b/w 18 & 44 years of age: Lav Agarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/9dVE8P7dTj
— ANI (@ANI) May 24, 2021