हैदराबाद – तेलंगाना राज्यातील मंचेरियल जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात एका बाईकस्वाराचा भीषण अपघातात मृत्यू झाला. पोलीस तपासणी टाळण्यासाठी हा बाईकस्वार वेगाने बाईक चालवत होता. मात्र सोबत असलेल्या मित्राच्या जीवावर हे बेतल. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. २२ मे रोजी तपालपूर गावात हा भीषण अपघात झाला.
मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. शनिवारी दोघजण एका दुचाकीवर येथून भरधाव वेगानं निघाले होते. यावेळी वन विभागाचा अधिकारी चेकपोस्टजवळ उभा होता. वेगानं येणारी दुचाकी पाहून अधिकाऱ्यानं हातवारे करून त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र तरीही दुचाकीस्वारानं वेग कमी केला नाही.
थरकाप उडवणारा व्हिडीओ ! चेकपोस्टवरील अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/cUJW5pjZ0d
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 24, 2021
दरम्यान चेकपोस्टवरील तपासणी चुकवण्यासाठी दुचाकीस्वाराने वेग आणखी वाढवला. त्यावेळी बाईकस्वार धडकू नये म्हणून चेकपोस्टवरील अधिकाऱ्याने बॅरिकेड्स हटविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याचवेळी दुचाकी चालवणाऱ्या युवकाने डोकं खाली केलं. मात्र त्याच्या मागे बसलेल्या युवकाला बॅरिकेड्सची जोरदार धडक बसली. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.