Houthi Attack : अमेरिका आणि ब्रिटनच्या सैनिकांनी येमेनमधील हुथी बंडखोरांच्या 12 ठिकाणांवर तब्बल 18 ड्रोन आणि दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोरांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन आणि ब्रिटनच्या संयुक्त मोहिमेत हुथी बंडखोरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या घटनेनंतर तणाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इस्त्रायल-हमास युद्धानंतर हुथी बंडखोर पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत होते. १९ नोव्हेंबर २०२३ पासून हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील तब्बल जहाजांवर २७ वेळा हल्ले केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या सुरक्षेवर परिणाम होत होता. अमेरिकन नौदलाने अनेक वेळा हुथी बंडखोरांचे हल्ले हाणून पाडले होते. हुती बंडखोरांनी हे हल्ले थांबा अन्यथा याचे मोठे परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेने दिला होता. मात्र तरीही हुथी बंडखोर यांनी अमेरिकेचा इशारा जुमानला नाही.
मेनच्या हुथी बंडखोरांनीही गुरुवारी उशिरा लाल समुद्रातील बोटींवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने इराण समर्थक हुथी बंडखोरांविरुद्ध युद्ध घोषित केले. क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचा वापर करून, दोन्ही देशांच्या सैन्याने येमेनमधील अनेक हुथी स्थाने नष्ट केली. हुथी बंडखोरांचे समुद्री हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल देखील सज्ज झाले होते. भारताने आपल्या ५ युद्धनौका अरबी समुद्र आणि लाल समुद्रात तैनात केल्या होत्या.
दरम्यान, मंगळवारी हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यापारी जहाजाला लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे अमेरिकन आणि ब्रिटनच्या सैन्यानं 18 ड्रोन, दोन क्रूज क्षेपणास्त्र आणि एक जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागून प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर गुरुवारी हुथी बंडखोरांनी एडनच्या आखातात जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागलं होतं. मात्र त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते.