पुणे – वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शहरातील प्रत्येक सिग्नलवर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) बसविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिका व स्मार्ट सिटी प्रशासनाने पुढाकार घेतला असून लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याचा फायदा पुणेकरांना होईल, असे मत पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेडतर्फे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेला 80 अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त दुचाकी देण्यात आल्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, “स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, बजाज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक गौरव श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
“स्मार्ट पोलीस बाईक’चा वाहतूक पोलिसांना फायदा होईल, असे स्पष्ट करून महापौर टिळक म्हणाल्या, “शहरात वाहतूक व सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीचा परिणाम पुणेकरांवर होतो आहे. प्रत्येक चौक, रस्त्यावरील प्रश्न वेगळे आहेत, पोलिसांनी त्याचा अभ्यास करून त्यानुसार चांगला पर्याय व उत्तर शोधले पाहीजे.’