तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील तळेगाव शहर वाहतूक पोलिसांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, वाहतूक शाखाचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांचा मार्गदर्शनाखाली विषेश मोहीमअंतर्गत अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाया व खटले भरने सुरु केले आहे. पुढील काळात सातत्याने ही कारवाई केली जाणार आहे.
अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करतना थेट पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी देणाऱ्या पालकांनी सावध राहावे, असा इशारा तळेगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल व वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे या मुलांना अटकाव करण्यासाठी त्यांच्या पालकांना कायद्याच्या कचाट्यात ओढण्याचा मार्ग पोलिसांनी स्वीकारला असून वाहन मालकाला १० हजारांचा दंड करण्यात येत आहे.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार तळेगावात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला असून, वाहतूक नियमभंग प्रकरणातही अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे.
विशाल गजरमल यांनी सांगितले कि, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून अल्पवयीन वाहन चालकांवर (१८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले) १९ गुन्हे, नशेच्या अंमलात वाहन चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह खटले ९३, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे खटले १३२ दाखल केले आहेत. तसेच विनापरवाना वाहने चालवतात, ट्रिपल सीटवहान चालविणे अशा वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढू शकते.