पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाआघाडीच्यावतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यामुळे पुणे स्टेशन, रस्ता पेठ आणि लष्कर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी आदल्याच दिवशी वाहतुकीचे नियोजन केले होते. पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र, हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातून समर्थक आल्याने वाहतूकीचा बोजवारा उडाला होता.
महायुतीची सकाळी १०:०० वाजता तर महाआघाडीची दुपारी सभा होती. या दोन्ही सभा भर रस्त्यात घेण्यात आल्या. महायुतीची सभा ब्लू नाईल तर महाआघाडीची सभा हॉटेल शांताई चौकात होती. सकाळी १०:०० पासूनच शिरुर आणि बारामती मतदार संघातून हजारो समर्थक वाहनांतून दाखल झाले होते. यातच सभेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती.
यामुळे पोलीस बंदोबस्तही तगडा होता. कार्यकर्त्यांनी जागा दिसेल तेथे वाहने लावली होती. सभा झाल्यानंतरही कार्यकर्त्यांची पांगापांग झाल्यावर अगदी दुपारी साडेतीन पर्यंत परिसरात वाहतूक कोंडी होती. जुना बाजार, रास्ता पेठ, जिल्हा परिषद नवी व जुनी इमारत, साधू वासवानी चौक, कौन्सिल हॉल आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.