पाणी प्रश्‍न सोडवा, अन्यथा मतदानावर बहिष्कार

पिण्याच्या पाण्याचा टॅंकर – 1200 रुपये
साध्या पाण्याचा टॅंकर – 800 रूपये
मोठ्या सोसायट्यांना दररोज लागणारे टॅंकर (प्रति सोसायटी) – 15 ते 20
मोठ्या सोसायट्यांचा मासिक खर्च (प्रति सोसायटी) – साडेपाच ते सव्वासात लाख

पिंपरी  – शहरातील सोसायट्यांना सध्या पाणी प्रश्‍नाने घेरले आहे. त्याबाबत वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करून देखील हा प्रश्‍न सुटलेला नाही. आता सोसायटीधारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या काही दिवसांत भेट घेऊन त्यांना याबाबत साकडे घालणार आहे. तसेच, हा प्रश्‍न न सुटल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी दिला आहे.
पवना धरण भरले आहे. मात्र, शहरातील सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांची तहान भागलेली नाही. पर्यायाने, उन्हाळा संपल्यानंतर देखील सोसायट्यांना टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. शहरात एकूण 3 हजार 869 सोसायट्या आहेत. त्यातील मोठ्या सोसायट्या या सुमारे 300 आहेत. मोठ्या सोसायट्यांना उन्हाळ्यात दिवसाला 30 टॅंकर पाणी लागत होते. सध्या हे प्रमाण निम्म्यावर म्हणजे 15 टॅंकरपर्यंत आले आहे. छोट्या सोसायट्यांना तुलनेत दररोज तीन ते चार टॅंकर लागत आहे.

सोसायट्यांतील रहिवाशांना प्रति व्यक्‍ती 135 लिटर इतके पाणी मिळायला हवे. 40 टक्के पाणी गळती थांबत नाही तोपर्यंत सोसायट्यांना जादाचे पाणी देता येणार नसल्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. सोसायटीधारकांना महापालिका प्रशासन सापत्नभावाची वागणूक देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत येत्या काही दिवसांमध्ये भेटून हा प्रश्‍न त्वरित सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे. हा प्रश्‍न न सुटल्यास सोसायट्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालतील.

– सुदेश राजे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.

Leave A Reply

Your email address will not be published.