वंदना बर्वे
नवी दिल्ली -एखाद्या चित्रपटात निवडणूक लढणारा बाहुबली जसा निवडणुकीचा प्रचार करतो तसाच प्रचार डॉन मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी करताना दिसत आहे. ओ. पी. राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने अब्बास अन्सारी यांना मउ सदर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अब्बास अन्सारी स्वत: एक शुटर आहेत आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय शुटींग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
अगदी तुरूंगात राहून विधानसभेची निवडणूक जिंकणारे बाहुबली…माफिया…डॉन मुख्तार अन्सारी यांनी यावेळेस मुलगा अब्बास अन्सारी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. मुख्तार अन्सारी सध्या तुरूंगात आहेत. मुख्तार अन्सारी 1996 पासून मउ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत, हे येथे उल्लेखनीय.
महत्वाचा मुद्या म्हणजे, चित्रपटात बाहुबली आपला प्रचार करतो तसाच प्रचार अब्बास अन्सारी करताना दिसत आहे. अब्बास यांच्या गाडीपुढे दोनदोन मोटरसायकल असतात. प्रचाराच्या ठिकाणी त्यांची एसयूव्ही थांबते. आणि उन्हाचा चष्मा घातलेले अब्बास गाडीमधूनच बाहेर डोकावतात. लोकांचा आशिर्वाद घेतात. कुणी त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर धक्काबुक्की सुध्दा होताना दिसते. अशात, मुलगा आपल्या वडिलाची जागा पुन्हा जिंकू शकणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
त्यांच्यामते, वडिल मुख्तार अन्सारी डॉन किंवा माफिया अजिबात नाहीत. भाजपचे नेते वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर, वडिल डॉन असते तर 1996 पासून निवडणुकीत विजयी झाले असते काय? असा उलट प्रश्न तेच करतात. मउ सदरमधून कोणतेही आव्हान नाही आणि आपण दीड लाखाने जिंकणार आहोत, असा त्यांचा दावा आहे.
भारतीय जनता पक्षाने अशोक सिंग यांना उमेदवारी दिली आहे. चारचार बंदुकधारी पोलिसांच्या सुरक्षेत राहुन सिंग यांना निवडणुकीचा प्रचार करावा लागत आहे. येथून बसपाचे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर मैदानात आहेत.