मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते. या तैलचित्राचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. मात्र यावरून आता एक नाराजीचा सूर समोर आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र काढणाऱ्या चित्रकार चंद्रकला कदम या मात्र या सर्व घडामोडीत नाराज असल्याचे सांगण्याची माहिती समोर येत आहे. याविषयीची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. चंद्रकला कदम यांनी हे तैलचित्र ऐनवेळी बदलल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना,’बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या चित्रकारितेच्या कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे मला देशाच्या संसदेत आणि गुजरात विधानभवनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तैलचित्र काढण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरात विधानभवनात सावरकरांचं तैलचित्र काढण्यासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती,’ असे चंद्रकला कदम यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “मी महाराष्ट्राच्या विधानभवनात सहा तैलचित्र काढली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र काढण्याची सरकारी ऑर्डर मला मिळाली, असं असताना हे चित्र बदलण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी एका चित्रकाराच्या दृष्टीकोनातून जो विश्वास माझ्यावर टाकला, त्या विश्वासाचा तुम्ही अपमान करू नये,” अशी प्रतिक्रिया चित्रकार चंद्रकला कदम यांनी दिली.
विधानभवनातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकला कदम यांचे चित्र मुख्यमंत्री दालनात लावले जाणार आहे. चित्रकार किशोर नादावडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे काढलेले तैलचित्र विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले आहे, त्यावरूनच चंद्रकला कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.