लातूर – महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर आमदार विकत घेतले, तुमच्या डोळ्यादेखत निवडून आलेले सरकार पाडले. ज्या आमदारांना तुम्ही मत दिली, ते आमदार पक्षांतर करत आहेत. तुमच्या डोळ्यादेखत लोकशाहीची हत्या केली.
आपल्या पूर्वजांनी स्वतंत्र भारतासाठी, लोकशाहीसाठी लढा दिला. मात्र, आज लोकशाहीच दिसत नाही, संविधान बदलण्याची भाषा केली जाते, अशा शब्दांत कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.
मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी झाल्यानंतर लातूर आणि धाराशिवमध्ये 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या निमित्ताने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची उदगीरमध्ये सभा झाली.
यावेळी त्यांनी रोजगार, महागाई, महिलांसाठी विविध योजनांचा दाखला देत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्रातील सत्तांतर, आमदारांच्या खरेदी व पक्षांतरावरुनही भाजपला लक्ष्य केले.
प्रियंका गांधी म्हणाल्या, मोदी सरकारने 16 लाख कोटी रुपयांची माफी बड्या उद्योगपतींना केली. मात्र, शेतकऱ्यांसाठी काय केले?. देशातील सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देशात आज 70 कोटी युवक बेरोजगार असून 30 लाख जागा गेल्या 10 वर्षांत मोदींनी भरल्याच नाहीत. महागाईने सर्व महिला भगिनी त्रस्त झाल्या आहेत.
गॅस सिलेंडर 1100 ते 1200 रुपयांवर पोहोचला होता. मात्र, निवडणुकी जवळ आल्या की सिलेंडरचे भाव कमी केले. महिलांसाठी सरकारकडून काहीही मिळत नाही, देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,
सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे काय हाल आहेत. शेतीच्या प्रत्येक मालावर जीएसटी लावण्यात येत आहे, असे म्हणत प्रियंका गांधींनी मोदी सरकावर हल्लाबोल केला.
हाथरस, उन्नाव, मणिपूर आणि महिला कुस्तीपटूंचा दाखला देत महिलांवर होत असलेल्या अन्यायावरुन त्यांनी सवाल उपस्थित केले. देशात महिलांवर अत्याचार होत असून अत्याचार करणाऱ्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले.
भाषणातील ठळक मुद्दे
– देशभरातील शेतकऱ्यांवर जीएसटी लावला
– महिलांना न्याय दिला जात नाही
– जिथे जिथे यांचे सरकार, तिथे तिथे भ्रष्टाचार
– देशात सगळ्यात जास्त गरिबी वाढली