नवी दिल्ली – सीबीआयने उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापा टाकला. राजधानी दिल्लीसह देशात एकूण सात राज्यांमध्ये 21 ठिकाणी या संबंधीत सीबीआयने छापे टाकले आहेत. यावर प्रतिक्रीया देताना आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला असून या कारवाईसाठी सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
सिसोदिया यांनी ट्विटरवर या संबंधात दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की, सीबीआय आली आहे. आम्ही प्रामाणिक आहोत, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. दुर्दैवाने या देशात, जो कोणी चांगले काम करतो त्याला असेच त्रासले जाते, म्हणूनच आपला देश अजूनही पहिल्या नंबरवर नाही- सीबीआय कारवाईचे स्वागत आहे. सत्य लवकरात लवकर बाहेर यावे यासाठी मी तपासात सहकार्य करेन. आतापर्यंत माझ्यावर अनेक खटले दाखल झाले आहेत, परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. या छाप्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. माझे काम देशातील चांगल्या शिक्षणासाठी आहे आणि ते थांबवले जाऊ शकत नाही असेही सिसोदिया यांनी नमूद केले आहे.
सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की अबकारी धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांचे निवासस्थान आणि चार सार्वजनिक सेवकांच्या परिसरासह दिल्ली आणि एनसीआरमध्ये 21 ठिकाणी छापे टाकले जात आहेत. छापा टाकण्यात आलेल्या परिसरांमध्ये दिल्लीचे माजी अबकारी आयुक्त अरवा गोपी कृष्णा यांचा समावेश आहे ज्यांच्या कार्यकाळात सुधारित उत्पादन शुल्क धोरण मंजूर करण्यात आले होते. जुलैच्या सुरुवातीला, नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्लीच्या सुधारित अबकारी धोरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. उत्पादन शुल्क धोरण 2021-22 च्या अंमलबजावणीत अनियमितता केल्याबद्दल राज्यपालांनी 11 अधिकाऱ्यांना निलंबीतही केले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये गोपीकृष्ण आणि उत्पादन शुल्क उपायुक्त आनंदकुमार तिवारी यांचा समावेश आहे.
सिसोदिया यांनी दुसऱ्या एका ट्विटर संदेशात म्हटले आहे की, आपल्यावर आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केलेले आरोप खरे नाहीत. हे लोक दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळेच शिक्षण आणि आरोग्याचे चांगले काम थांबवण्यासाठी आरोग्यमंत्री आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री त्यांच्या रडारवर आहेत, असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.