गडचिरोली – प्रियकरासोब फिरण्यास मनाई केल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उघडकीस आली आहे. निर्मला (वय 49) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव असून उर्मिला आणि रुपेश अशी आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अहेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस गस्त घालत असताना आरोपी उर्मिला आणि प्रियकर रुपेश रस्त्याने ये-जा करत होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांना त्यांची चौकशी केली असता काहीतरी प्रकार घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस त्यांना घरी घेऊन गेले असता, घरात महिला मृतावस्थेत आढळून आली.
पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. आई मला रुपेशसोबस फिरण्यास मनाई करत होती, तिला आमचे प्रेमसंबंध मान्य नव्हते, असे आरोपी उर्मिलाने सांगितले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. आरोपी उर्मिलाचे वडील चंद्रकांत पोलिस दलात कार्यरत होते. 20 वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर उर्मिलाचे पालनपोषण तिच्या आईने केले. सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या घटनेने निर्मला यांच्या मृत्यूबाबात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.