कागद खरेदीसाठी 1 कोटीची मान्यता
पुणे – करोना उपाययोजनांसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च झाले असून, राज्य सरकारकडे निधीची मागणी महापालिकेतील सत्ताधारी करत आहेत, तर दुसरीकडे करोनाच्या नावाखाली स्थायी समितीने अक्षरश: डोळे झाकून वाट्टेल त्या खरेदीला मान्यता देण्याचा सपाटा सुरू केला आहे. वैद्यकीय उपकरणे किंवा अन्य उपचारासाठीच्या गोष्टींबाबत ठीक आहे परंतु कोविडच्या नावाखाली थेट एक कोटी रुपयांचा कागद खरेदी करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. या पैशांतून ए-3 आणि ए-4 कागद खरेदी केला जाणार आहे.
भांडार विभागाकडून या कागदाची खरेदी केली जाणार आहे. महापालिका करोना सेंटर आणि महापालिकेच्या विविध खात्यांसाठी ही कागद खरेदी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेच्या दाते मुद्रालयाकडून कागदांची खरेदी करण्यात येते. याठिकाणी महापालिकेला आवश्यक असणारी छपाई केली जाते. रुग्णालयाचे फॉर्म, प्रमाणपत्र छापण्यात येतात. महापालिकेचे सर्व व्यवहार ऑनलाइन करून कार्यालये पेपरलेस केल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते.जन्म, मृत्यूचे दाखले एका खासगी संस्थेला काम देण्यात आले आहे. असे असताना 96 लाख रुपयांची कागद खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये केवळ झेरॉक्स पेपरचा समावेश आहे. महापालिका ए 4 साईजच्या 25 हजार रीम आणि ए 3 आकाराच्या 1,600 हजार रीम खरेदी करणार आहे.