गर्भातच करोना झालेले बाळ-आईही सुखरूप
पुण्यातील “केस’ आंतरराष्ट्रीय पातळीवर
पुणे – ‘आई करोना पॉझिटिव्ह असली, तरी जन्मलेले बाळ निगेटिव्ह’, असे पाहायला मिळाले. मात्र, बाळ गर्भात असताना नाळेद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याची दुर्मीळ घटना ससून रुग्णालयात समोर आली. परंतू, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे प्रसूतीनंतर बाळाला उपचार देऊन आई आणि बाळाला सुखरूप घरी सोडण्यात यश आले आहे.
बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, “22 वर्षीय गर्भवती मेमध्ये प्रसूतीसाठी आली होती. त्याआधी तिला ताप होता. चाचणी केली असता, करोना अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, संशय आल्याने डॉक्टरांनी गर्भातील बाळाच्या स्वॅबसह नाळ आणि नाभीचे नमुने घेतले. ते तीनही नमुने करोना पॉझिटिव्ह आले. प्रसूतीनंतर बाळ पॉझिटिव्ह असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्याला “निओनेटल आयसीयू’मध्ये उपचार करण्यात आले.
तब्बल तीन आठवडे बाळावर उपचार सुरू होते. दरम्यान, अशा प्रकारचा संसर्ग हा भारतात पहिल्यांदाच घडल्याचा दावा पुण्यातील ससून रुग्णालयाने केला आहे. या संक्रमणावर वैद्यकिय क्षेत्रातील नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी शिक्कामोर्तब केले आहे. तीन आठवड्यानंतर आई व बाळाला घरी सोडण्यात आले.’
“व्हर्टिकल ट्रान्समिशन’ म्हणजे काय?
आईकडून बाळाला नाळ (प्लासेंटा), गर्भ (वोम्ब) किंवा गर्भातील पाण्याद्वारे (ऍम्नॉईड फ्ल्यूड) होणारा संसर्ग म्हणजे “व्हर्टिकल ट्रान्समिशन’. यापूर्वी झिका, एचआयव्ही या आजारांचे असे व्हर्टिकल संसर्ग होत असल्याचे पुरावे आहेत. चीन व अमेरिकेत करोनाचा व्हर्टिकल संसर्ग झाल्याच्या सात ते आठ केसेस समोर आल्या. मात्र, पुण्यातील ही केस वगळता देशात असा संसर्ग आढळला नाही. मात्र, ससूनमध्ये ही बाब समोर आल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
प्रकृती गंभीर असताना डॉक्टरांच्या प्रयत्नांनी बाळाला वाचवण्यात यश मिळाले. याबाबतचा प्रबंध आंतरराष्ट्रीय वैद्यकिय नियतकालिकाने स्वीकारला आहे. भारतातील अशी पहिली केस यशस्वीपणे हाताळणाऱ्या संबंधित डॉक्टरांचे अभिनंदन.
– डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय