मंचर -लोणी (ता. आंबेगाव) येथे सामाईक जागेच्या वादातून रघुनाथ सिनलकर यांना चौघांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (दि. 26) रघुनाथ सिनलकर हे सकाळी साडेआठच्या सुमारास घरी असताना त्याच्या जुन्या घराच्या जागेत जेसीबी चालू असल्याचा त्यांना आवाज आला. सिनलकर त्या ठिकाणी गेले असता त्यांचा चुलत भाऊ ईश्वर सिनलकर घराच्या सामायिक जागेत जेसीबीने उकरत होता.
त्यावेळी रघुनाथ सिनलकर यांनी ही जागा आपली सामायिक असून तिथे उकरण्यास मनाई केली असता ईश्वर सिनलकरने ही जागा उकरणार तुला काय करायचे ते कर, असे म्हणून दगडाने रघुनाथ सिनलकर यांना मारहाण केली. याबरोबरच ईश्वर सिनलकर यांच्या कुटुंबातील ज्ञानेश्वर सिनलकर, इंदुबाई सिनलकर, पूनम सिनलकर तेथे आले व त्यांनीही फिर्यादी रघुनाथ सिनलकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
याबाबत रघुनाथ नवनाथ सिनलकर (रा. लोणी) यांनी ईश्वर गुलाब सिनलकर, ज्ञानेश्वर गुलाब सिनलकर, इंदुबाई गुलाब सिनलकर, पूनम ज्ञानेश्वर सिनलकर (सर्व रा. लोणी) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान विलास साबळे करीत आहेत.