पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नोटीस देऊनही जिल्ह्यात अनधिकृत विकसनाचे (प्लॉटिंग) खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. त्यामुळे या नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना चांगलेच महागात पडले असून, मावळ आणि हवेली तालुक्यातील सहा विकसनधारकांवर पीएमआरडीए’कडून कारवाई करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
अशी माहिती पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितली. त्यामुळे पीएमआरडीए’च्या हद्दीत प्लॉट खरेदी करणार्यापूर्वी नागरिकांनी खरेदीदारांनी त्या प्लॉटिंगसाठी पीएमआरडीए’कडून परवानगी घेतली असल्याची खात्री करून घ्यावी. मंजूर प्लॉटिंग आराखडे तपासूनच प्लॉट खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले.
पीएमआरडीएच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये सर्वेक्षण करून अनधिकृत प्लॉटिंग करून विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पीएमआरडीए’ क्षेत्रात अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग करून जागा मालक व विकसक हे विक्री किंवा त्यावर विकसनाचे काम करत असल्याचे आढळलेले आहे. अनधिकृत रेखांकन सक्षम प्राधिकाऱ्यांची रितसर विकसन परवानगी व विकसन आराखड्यास मंजुरी न घेता विक्री करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
त्यामध्ये हवेलीत दोन गुन्हे दाखल असून, नमो पार्कच्या हरिदास धनराज भन्साळी यांनी ऊरळी कांचन येथील सर्व्हे नंबर 1060, 1061 आणि 1062 येथे अनधिकृत प्लॉटिंग केले आहे. तर रिव्हर व्ह्यू पार्कच्या गुलाब भागुजी चौधरी, राहुल गुलाब चौधरी यांनी मांजरी येथे सर्व्हे नंबर 24/2/4 येथे अनधिकृत प्लॉटिंग केले आहे.
मावळ तालुक्यातील संतोष प्रभाकर तरस, राजू गोरखनाथ माळी, राकेश शहाजी मुर्हे, इराण्णा रायचूरकर, कुणाल सुभाष अगरवाल या तिरूपती ग्रुपच्या चार वेगवेगळ्या डेव्हलपर्सवर गुन्हे दाखल केले आहेत. मावळमधील सोमाटणे येथे सर्व्हे नंबर 256, 257, शिरगाव येथील सर्व्हे नंबर 40 आणि सर्व्हे नंबर 28 येथे अनधिकृत प्लॉटिंग केले आहे.