जेरुसलेम, (इस्रायल) – गाझामध्ये युद्धविराम लागू करण्यात यावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटरेस (Antonio Guterres) यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांना संयुक्त राष्ट्राच्या कायद्यातील कलम ९९ अंतर्गत आपत्कालिन परिस्थितीमध्ये वापरण्याच्या अधिकारांचा वापर करत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला हे आवाहन केले आहे.
गाझामधील अत्यंत विपरीत परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने युद्धबंदी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. गाझामधील युद्धस्थिती ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला हानी पोचवू शकते, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे.
मात्र इस्रायलने गुटरेस यांच्या या आवाहनावर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे हमासला मदतच होऊ शकते. हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलविरोधात केलेल्या कृत्याचे समर्थनच यामुळे केले जात आहे. गुटरेस यांचा कार्यकाळ संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी दिली आहे. जो व्यक्ती जगाच्या शांततेचा पाठीराखा आहे, त्याने हमासपासून गाझाला स्वतंत्र्य करण्याला पाठिंबा दिलाच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गाझामधील युद्धजन्य परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. ही परिस्थिती यापेक्षा अधिक चिघळू नये, यासाठी ही आपत्ती तातडीने समाप्त व्हावी याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायावर आहे.
– ऍन्टोनिओ गुटरेस(संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस)
अपवादात्मक परिस्थितीतील अधिकार…
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस झाल्यापासून गुटचरेस यांनी प्रथमच कलम ९९ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आतापर्यंतच्या ७८ वर्षांच्या इतिहासामध्ये या अधिकारांचा वापर क्वचितच केला गेलेला आहे. जागतिक शांततेला धोका निर्माण झाल्याचे सरचिटणीसांनी सुरक्षा परिषदेला सांगितल्याची वेळ आतापर्यंत अवघ्या १० वेळा आली आहे. यापूर्वी पूर्व पाकिस्तानमधील स्थितीच्या मुद्यावरून तत्कालिन सरचिटणीस यू. थांत यांनी सुरक्षा परिषदेला हस्तक्षेपाची सूचना केली होती. मात्र त्यावेळी भारताने लष्करी हस्तक्षेप करून पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला होता आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती.