तेल अलिव – हमासचा म्होरक्या इस्माईल हनीयेह याची ३ मुले आणि ३ नातवंडे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये ठार झाली आहेत. बुधवारी गाझा पट्ट्यामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इस्माईल हनीयेहचे कुटुंबीय मारले गेले आहेत. इस्रायल सूडभावनेपोटी हे हल्ले करत असल्याचा आरोप इस्माईल हनीयेहच्यावतीने करण्यात आला आहे. (Hamas leader Ismail Haniyeh’s 3 children and 3 grandchildren killed in Israeli attack)
इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये मारले गेलेल्यांमध्ये इस्माईल हनीयेहची मुले सर्वात महत्वाच्या व्यक्ती होत्या, असे मानले जाते आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर या घटनेचा नक्की किती आणि कसा परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठार झालेल्यांमध्ये एक सेल कमांडर आणि दोन लष्करी ऑपरेटिव्ह –
मध्य गाझामधील दहशतवाद्यांवर कारवाई केली, असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. मात्र या कारवाईचा तपशील जाहीर केला गेला नाही. ठार झालेल्यांमध्ये एक सेल कमांडर आणि दोन लष्करी ऑपरेटिव्ह असल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.
हमास कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही –
आपले कुटुंबीय मारले गेल्याच्या वृत्ताला हनिएफने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दुजोरा दिला आहे. जेरुसलेम आणि अल अक्सा मशिद मुक्त करण्याच्या मोहिमेवर असताना आपल्या मुलांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे त्याने म्हटले आहे. कोणत्याही कायद्याला न जुमानता आपल्याविरोधात हत्या आणि सूडभावनेतून शत्रू कार्यरत आहे, असेही त्याने म्हटले आहे. हमास कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे देखील हनिएफने म्हटले आहे.
ड्रोनने हे वाहन उडवून देण्यात आले –
इस्माईल हनिएफ कतारमध्ये रहातो आहे. युद्धात जखमी झालेल्या अनेक पॅलेस्टिनींना उपचारांसाठी दोहा येथे हलवण्यात आले आहे. त्यांच्याकडून हनिएफला आपल्या मुलांच्या मृत्यूची बातमी समजली आहे. हजेम, आमिर आणि मुहम्मद हनिएफ हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाझा शहरातील शाती शरणार्थ्यांच्या शिबीरात रहात होते. हे सर्वजण एकाच वाहनातून जात असताना इस्रायलच्या ड्रोनने हे वाहन उडवून देण्यात आले. या हल्ल्यात एकूण ६ जण ठार झाले. त्यात हजेमची कन्या, आमिरची कन्या आणि मुलगाही होते, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.