खेरसोन, (युक्रेन) – रशियाने फोडून टाकलेल्या धरणामुळे आलेल्या मोठ्या पूरस्थितीची आज युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी पाहणी केली. या पुरामध्ये आतापर्यंत किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे, असे रशियाच्या प्रशासनाने नियुक्त केलेल्या महापौरांनी म्हटले आहे. या पुराचा फटका 60 हजार लोकांना बसला आहे, असे नोव्हा काखोवकाचे रशियन-नियुक्त महापौर व्लादिमीर लिओनतेव्ह यांनी सांगितले.
पुराचे पाणी शिरलेल्या डझनभर शहरांमधून आतापर्यंत 6 हजारांपेक्षा अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. निपर नदीच्या किनाऱ्यांवरील रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या नियंत्रणात असलेल्या अनेक गावांमधील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. गेल्या वर्षभरापासून युद्धाच्या छायेखाली असलेल्या या गावकऱ्यांच्या संकटात आता पुरामुळे भर पडली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत, शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे, वीज आणि मोबाइल फोनचे नेटवर्क मर्यादित किंवा पूर्णपणे बंद झाले आहे.
नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या कामाची आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी झेलेन्सकी यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पुरामुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
रशियाचे नियंत्रण असलेल्या भागांमध्ये किमान 2 डझन लोकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 4,280 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले असून 14 हजार इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. जलसाठ्यातील सर्व पाणी वाहून गेल्यामुळे आता क्रिमियाला होणारा पाणीपुरवठा काही काळ खंडीत राहील. पुन्हा पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी धरण 80 टक्के भरणे आवश्यक आहे, असे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पुरामुळे सुमारे 600 चौरस किलोमीटरच्या भागात पसरलेल्या पाण्याची पातळी साडेपाच मीटर इतकी आहे. रशियाच्या ताब्यातील दोन तृतीयांश भूभाग देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे युक्रेनबरोबर रशियालाही या पुरामुळे हानी सोसावी लागते आहे.