पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून रूफ टॉप हॉटेलचे प्रमाण वाढले आहे. मात्र, रूफ टॉप हॉटेल उभारताना अग्निशमन यंत्रणा अपर्याप्त व अकार्यान्वित असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे ही बाब अग्नि व जीव सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने अग्निशमन विभागाने शहराच्या विविध भागातील इमारतीवरील अधिकृत व अनधिृकत अशा 52 रुफ टॉप हॉटेल चालकांना नोटीस धाडल्या आहेत. या नोटीस अंतर्गत आपला व्यवसाय अधिकृत आणि वैध रित्या सुरू असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले असून सुमारे डझनभर कागदपत्रे सादर करण्यास सांगितली आहेत. यामुळे हॉटेल चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शहराचा झपाट्याने विकास होत असून लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहर परिसरात विविध व्यवसायांसह हॉटेलची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रुफ टॉप हॉटेलचे फॅड आले आहे. ग्राहकांच्या तसेच कामगारांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता शहरात रुफ टॉप हॉटेल सुरू आहेत. या रुफ टॉप हॉटेल व बार संदर्भात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील रुफ टॉप हॉटेलचा प्रत्यक्ष शोधमोहीम राबविली. यामध्ये रुफ टॉप हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा अपर्याप्त व अकार्यान्वित असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले. ही बाब अग्नि व जीव सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाने 52 रुफ टॉप हॉटेल चालकांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.
आमदारांनी रुफ टॉप हॉटेल संदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शहरातील रुफ टॉप हॉटेलची अग्निशमन विभागाकडून पाहणी करण्यात आली. पाहणीमध्ये त्रुटी आढळलेल्या 52 रुफ टॉप हॉटेल चालकांना नोटीस देऊन विविध प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रमाणपत्र सादर न केल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– विजयकुमार थोरात,सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभाग
ही प्रमाणपत्रे सादर करावी लागणार
हॉटेल व्यवसाय अनधिकृतरित्या व अवैधरित्या सुरू नसल्याबाबत सिद्ध करा, बांधकाम परवानगी विभागामार्फत इमारतीचा संपूर्ण मंजूर नकाशा संच, इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र, पूर्णत्वाचा दाखला, वार्षिक नूतनीकरण केलेला अग्रिशमन ना हरकत दाखला, अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना प्रमाणपत्र, दुकाने निरीक्षक कार्यालयाचा दुकान कायदा परवाना, आकाशचिन्ह व परवाना विभागाचे हॉटेल व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षक. येरवडा, पुणे यांच्याकडील विद्युत यंत्रणा सुरक्षितता प्रमाणपत्र, गॅस वितरकाचे प्रमाणपत्र, हॉटेल जागा, मिळकत मालकी हक्क संबंधित सर्व दस्तावेज, भागीदारपत्र, भाडे तत्वावर असल्यास भाडेकरारनामा, मद्यसाठा होत असल्यास त्याचे वैध मद्य विक्री परवाना प्रमाणपत्र, हॉटेलच मालक, चालक आणि व्यवस्थापक यांचे ओळखपत्र आणि पालिकेच्या आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.