Udhayanidhi Stalin : द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावर वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आपल्या वक्तव्याची मोडतोड करून त्याची संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनवला असल्याची टीका स्टॅलिन यांनी केली आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, करूर जिल्ह्यातील DMK युवा विंगचे सचिव, उदयनिधी यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाग घेतला जेथे त्यांनी पुन्हा एकदा सनातन धर्म वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान माझ्या भाषणाचा उल्लेख केला होता. “मी न बोललेल्या गोष्टी बोलल्याचा आरोप त्यांनी माझ्यावर केला.” त्यासोबतच “मी फक्त (सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचा) नरसंहार करण्याचे आवाहन केले होते.”असे त्यांनी यावेळी म्हटले.
द्रमुक नेते पुढे म्हणाले, “मी एका परिषदेत सहभागी झालो आणि तिथे फक्त तीन मिनिटे बोललो. मी एवढेच म्हणालो की, प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे, त्यांच्याशी भेदभाव केला जाऊ नये आणि भेदभाव करण्याचा कोणताही प्रयत्न दूर केला पाहिजे. पण त्यांनी (भाजप) माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, अतिशयोक्ती केली आणि संपूर्ण देशात या मुद्दयाला चर्चेचा विषय बनवला.
उदयनिधी यांनी पुढे म्हटले,“काही संतांनी माझ्या डोक्यावर 5-10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगण्यात आले होते पण मी म्हणालो की, मी माफी मागू शकत नाही. “मी म्हणालो की मी स्टॅलिनचा मुलगा आहे, कलैगनरचा नातू आहे आणि मी फक्त त्यांनी ज्या विचारसरणीचे समर्थन केले होते ते व्यक्त करत आहे.” असे म्हणत आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.