पिरंगुट – मुळशी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी शुक्रवारी (दि. 21) रात्री ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, तालुका प्रमुख दीपक करंजावणे आदी उपस्थित होते.
दहा वर्षांपूर्वी चांदेरे यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. कॉंग्रेस पक्षात असताना त्यांनी दोन वेळा मुळशी पंचायत समितीवर निवडून येत सभापती पद सांभाळले आहे, तसेच युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. दरम्यानच्या काळात मुळशी तालुक्यात अपंग कल्याण संस्था स्थापन करून दिव्यांगाचे संघटन उभारले आहे आहे.
याबाबत बाळासाहेब चांदेरे यांनी संगितले की, गेल्या दहा वर्षांपासून मी शिवसेनेचे सक्रिय काम करत आहे. सध्याच्या परिस्थिती पक्षातील काही स्थानिक पदाधिकारी पक्षाचा प्रोटोकॉल सोडून कुरघोडीचे राजकारण करत आहे. मी मूळ कॉंग्रेसचा युवक जिल्हाध्यक्ष, मुळशी पंचायत समिती सभापती म्हणून काम करत होतो. 2014ला भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून पक्ष प्रवेश देण्यात आला. 2019 ला पक्षाने दुसऱ्यांदा अपेक्षा भंग केला.
दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बाळासाहेब चांदेरे यांची शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.