नेवासा – श्रीरामपूर राज्यमार्गाच्या रस्त्याचे सुरु असलेले काम नेवासा फाटा ते लोखंडी फॉलपर्यंत रातोरात पूर्ण करण्यात आले. रस्ता कामातील साईट पट्ट्या न बुजवताच ठेकेदार आता गायब झाला आहे. बिले काढण्यात आली असून त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून केल्या जात आहेत. ठेकेदाराने अर्धवट काम आटोपून पसार झालेला असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.
या रस्ता कामात कागदोपत्री दाखविण्यात आलेली एकही सुविधा रस्त्यावर नसतांना चक्क खोटी बिल काढण्यात आली आहे. तर डांबरीकरण करून साईडपट्टया न बुजविताच ठेकेदार फरार झालेला असून बांधकाम विभाग या ठेकेदाराला नेमके का पाठीशी घालते असा सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे. ठेकेदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता डांबरीकरण करुन साईटपट्ट्या बुजविलेल्या नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेवासा वकील बांधवांनी आंदोलन केल्यामुळे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराची कानउघडणी केली होती. आता रस्ता काम पूर्ण होऊन तीन- महिने झाले असतांनाही काम पूर्ण झालेले नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.