U19 World Cup 2024, India vs Ireland Cricekt Match : अंडर-19 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात आशियाई चॅम्पियन बांगलादेशचा पराभव केला होता. आता गुरूवारी झालेल्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 201 धावांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भारत पुढच्या फेरीत खेळणार हे निश्चित आहे.
उदय सहारनच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करताना मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 गडी गमावून 301 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 29.4 षटकात केवळ 100 धावा करू शकला आणि 201 धावांनी पराभूत झाला. मुशीर खान सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी 302 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाने ठराविक अंतराने सातत्याने विकेट गमावल्या. आयर्लंडकडून डॅनियल फोर्किनने सर्वाधिक 27 धावा केल्या. त्यांच्याशिवाय ऑलिव्हर रिले (15 धावा), रायन हंटर (13 धावा) आणि जॉर्डन नील (11 धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आयर्लंडचे बाकी 7 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. 22 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर आयरिश संघाने एकेकाळी 45 धावांत 8 विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऑलिव्हर रिले आणि डॅनियल फोर्किन यांनी मिळून 10व्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. 11व्या क्रमांकाचा फलंदाज फिन ल्युटननेही 7 धावा केल्या. अशा प्रकारे संघाला 100 धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून गोलंदाजीत नमन तिवारीने सर्वाधिक चार आणि सौम्या पांडेने तीन बळी घेतले. तर उदय सहारन ,मुरुगन अभिषेक आणि धनुष गौड़ा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
A comprehensive win for India in Bloemfontein 👏#U19WorldCup #INDvIRE pic.twitter.com/ha9m0HCndO
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 25, 2024
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. आदर्श सिंग 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अर्शीन कुलकर्णीने मुशीरसह दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. अर्शीन हा 55 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला. त्यानंतर मुशीरने कर्णधार उदयसोबत तिसऱ्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. उदय 84 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 75 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 106 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 118 धावा करून मुशीर धावबाद झाला. प्रियांशू मौलिया दोन धावा करून तर मुरुगन अभिषेक खातेही न उघडताच बाद झाला.
अरावेली अवनीशने 13 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. त्याचवेळी सचिन धसने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावांची तुफानी खेळी करत भारताची धावसंख्या 300 पार नेली, जी या मैदानावरील अंडर-19 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने शेवटच्या 10 षटकात 119 धावा केल्या.
आयर्लंडकडून गोलंदाजीत ऑलिव्हर रिलेने तीन बळी घेतले. त्याचवेळी जॉन मॅकनॅलीने दोन गडी बाद केले. फिन लुटनने एक विकेट घेतली.