U19 World Cup AUS vs IND Final : सीनियर स्तरावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनल आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये भारताचा पराभव केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने आता ज्युनियर स्तरावर देखील भारतीय चाहत्यांचे स्वप्न पुन्हा भंग केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 79 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावांवर गारद झाला.
Relentless Australia down India in Benoni to clinch their fourth #U19WorldCup title 🎇#INDvAUS pic.twitter.com/wn7GPVc3xc
— ICC (@ICC) February 11, 2024
कांगारूंनी भारतीय संघाचे वर्षभरात तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी कांगारूंनी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव केला होता. आता 85 दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा तिसऱ्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात (अंडर-19 विश्वचषक 2024) पराभव केला आहे.
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचे हे चौथे विजेतेपद आहे. याआधी त्यांनी 1988, 2002 आणि 2010 मध्येही विजेतेपद पटकावले होते. ऑस्ट्रेलियाने 14 वर्षांनंतर अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. भारत पाच वेळा चॅम्पियन आहे. त्याने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विजेतेपदावर कब्जा केला होता. यासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचा भारताचा इरादाही उधळला. आतापर्यंत केवळ पाकिस्तानलाच सलग दोनदा अंडर-19 विश्वचषक जिंकता आला आहे. 2004 आणि 2006 मध्ये त्याने हे केले होते.
The #BoysInBlue fought hard but it’s Australia who win the #U19WorldCup Final by 79 runs.
Scorecard ▶️ https://t.co/RytU4cGJLu#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/pg2KhIbPx2
— BCCI (@BCCI) February 11, 2024
प्रमुख फलंदाजांनी केली निराशा…
भारताकडून आदर्श सिंगने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. मुरुगन अभिषेकने 42 धावांचे योगदान दिले तरनमन तिवारी 14 धावा करून नाबाद राहिला. मुशीर खान, उदय सहारन, सचिन दास आणि प्रियांशू मौलिया यांसारख्या फलंदाजांनी निराशा केली. वास्तविक, टीम इंडियाचे फलंदाज सतत पॅव्हेलियनमध्ये परतत होते. सलामीवीर आदर्श सिंगने एक बाजू लावून धरली असली तरी दुसऱ्या बाजूनं इतर फलंदाजाची साथ लाभली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा 79 धावांनी पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाकडून मेहेल बियर्डमन आणि राफे मॅकमिलन हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. मेहेल बियर्डमन आणि राफे मॅकमिलन यांना प्रत्येकी 3-3 यश मिळाले. कॅलम वाइल्डरने 2 बळी घेतले. चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रेकरने 1-1 फलंदाज बाद केले.
#U19WorldCup #AUSvsIND Final Live Score : ऑस्ट्रेलियाचं टीम इंडियासमोर विजयासाठी 254 धावांचे लक्ष्य…
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 55 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार ह्यूने 48 धावांची शानदार खेळी केली. हॅरी डिक्सनने 42 धावा केल्या. याशिवाय ऑलिव्हर पीक 46 धावांवर तर टॉम स्ट्रेकर 8 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारन अवघ्या 8 धावा करून बाद झाला.
टीम इंडियासाठी गोलंदाजीत राज लिंबानीने 10 षटकात 38 धावा देत 3 बळी घेतले. नमन तिवारीने 2 बळी घेतले. सौम्या पांडे आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.